ग्रामीण, शहरी भागात होळीकोत्सव-धुळवड साजरी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
दरवर्षीप्रमाणे रायगड जिल्ह्यात होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने चाकरमानी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झाले होते. गुरुवारी सायंकाळी चार हजारांहून अधिक होळ्यांचे पूजन करून रात्री दहन करण्यात आले. होलिकोत्सवानंतर शुक्रवारी सकाळपासून शहरी व ग्रामीण भागात अबालवृद्धांनी रंग लावून धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला. त्यामुळे रंगांच्या रंगात प्रत्येक जण न्हाऊन निघाला होता. जिल्ह्यातील समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटकांनीही रंगोत्सव साजरा केला. जिल्ह्यामध्ये दोन दिवस शिमगोत्सवाचा जल्लोष पहावयास मिळाला.
जिल्ह्यामध्ये पारंपरिक पेहराव करीत होळीला पुरणाची पोळीचे नैवेद्य दाखवून पूजन करण्यात आले. त्यानंतर रात्री अकरानंतर होळीचे दहन करण्यात आले. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ असा जयघोष करीत तरुणांसह अनेक मंडळींनी या उत्सवात सहभाग घेतला. रात्री ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कोळीगीतांसह मराठी व हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर नाचत अनेकांनी हा सण उत्साहात साजरा केला.
दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.14) सकाळपासून धुळीवंदनाला सुरुवात झाली. बाजारात दाखल झालेल्या वेगवेगळ्या प्रकारचे रंग खरेदी करून त्या रंगांची उधळण करण्यात आली. काहींनी रंगाने भरलेल्या फुग्यांचा मार करीत धुळवड साजरी केली. काहींनी एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला. काहींनी कुटुंबियांसह, तर काहींनी मित्र मंडळींसमवेत धुळीवंदन सण साजरा केला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावे, वाड्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. संपूर्ण गावात तरुणांनी फिरून भेटेल त्यावर रंगांची उधळण करीत आनंद साजरा केला. तसेच शहरी भागातदेखील होलिकोत्सासह धुळवड साजरी करण्यात आली. अलिबाग समुद्रकिनार्यासह वरसोली व अन्य समुद्रकिनारी पर्यटकांनी व स्थानिकांनी अलोट गर्दी केली होती. एकमेकांवर रंगांची उधळण करण्याबरोबरच शिमगोत्सवाच्या शुभेच्छादेखील अनेकजण देत होते. अबालवृद्धांपासून सर्वच मंडळी या उत्सवात सामील झाले. विशेष म्हणजे, मोबाईलमध्ये मग्न असणारी बच्चे कंपनी व तरुणाई यावेळी स्वखुशीने या उत्सवात सहभागी झाली होती. ढोल, खालूबाजा वाजविण्यात ही मंडळी मग्न झाली होती. एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याबरोबरच रंगदेखील उडवत होते. यावेळी पर्यावरणपूरक रंगाला तरुणाईने अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच हा उत्सव साजरा होत असताना महिलांची छेडछाड करणार्यांवर पोलीस लक्ष ठेवून होते. समुद्रकिनार्यांसह वेगवेगळ्या ठिकाणी साध्या गणवेशात तसेच खाकी वर्दीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.