विज्ञान, हस्तकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला दिशा

शिपुरकर, वाघरे शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

| माणगाव | प्रतिनिधी |

शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळेत यावर्षीही विज्ञान, कला, शिल्प आणि हस्तकला यांचे भव्य वार्षिक प्रदर्शन भरविण्यात आले. शुक्रवारी (दि.16) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन अडानी सिमेंट कंपनीचे दिनकर सोनसूरकर आणि शुभम कामडी यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. विनोद घायाळ, उद्योजक नितीन बामगुडे, शिपुरकर, स्नेह ओसवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालक, शिक्षक, विज्ञानप्रेमी, कला रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलात्मक व वैज्ञानिक प्रयोगांचा आस्वाद घेतला. लहानग्यांच्या हातून साकारलेल्या प्रयोगात्मक मॉडेल्स आणि कलाकृती पाहताना अनेक जण थक्क झाले. तर काही पालकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळताना दिसून आले. या विज्ञान व हस्तकला प्रदर्शनात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

पर्यावरण संतुलन, प्रदूषण नियंत्रण, ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, वाढते तापमान, संगणक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याचे फायदे व मर्यादा, निसर्ग संवर्धन, विकसित भारत अशा विविध विषयांवर आधारित विज्ञान मॉडेल्स आणि प्रात्यक्षिके मांडण्यात आली होती. ही मॉडेल्स केवळ माहिती देणारी नसून कारण, परिणाम, वैज्ञानिक तर्क, समस्या आणि उपाय यांची सोपी आणि प्रभावी मांडणी करणारी होती. विद्यार्थ्यांनी संशोधनाची प्रक्रिया समजून घेत, प्रत्यक्ष कृतीतून विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. हस्तकला व कला विभागातही पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा वैज्ञानिक संदेश स्पष्टपणे दिसून आला.

झाडांच्या पानांचे नैसर्गिक छाप, रंगसंगतीने नटलेली चित्रकला, पारंपरिक वारली पेंटिंग, माचिस काड्यांपासून साकारलेली शिल्पे, पुनर्वापरयोग्य साहित्यापासून बनवलेले फ्लॉवर पॉट्स, कागदी पिशव्या, स्क्रॅप साहित्यापासून तयार केलेले सजावटीचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड्स, टि-शर्टवरील कल्पक डिझाईन्स, भावस्पर्शी पोर्ट्रेट्स अशा असंख्य कलाकृतींचे दर्शन घडले.

एकूणच, शिपुरकर व वाघरे इंग्रजी माध्यम शाळेतील हे विज्ञान, कला व हस्तकला प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळालेली दिशा, वैज्ञानिक विचारांना मिळालेली चालना आणि शिक्षणासोबतच संस्कार व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

एकत्रित सादरीकरण
शाळेमध्ये संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विविध वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी निरीक्षण, संशोधन, विश्लेषण आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या आधारे तयार केलेल्या उत्कृष्ट कलाकृती आणि वैज्ञानिक मॉडेल्सचे एकत्रित सादरीकरण या प्रदर्शनात करण्यात आले होते. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी देत, त्यांच्या विचारांना योग्य दिशा आणि व्यासपीठ देण्याचा हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.
Exit mobile version