| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून गुरुवारी (दि.19) छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गिते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये सार्थक नागावकर, गौरी पुरोहित आणि हर्षाली सानप या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
शिक्षकांच्या मनोगतामध्ये प्रा. नितीन कराळे, प्रा. मिलिंद घाडगे यांनी शिवजन्मोत्सवाचा ऐतिहासिक आढावा घेतला. कला विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे आपल्या मार्गदर्शनामधून सांगितले. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गिते यांनीही आपल्या मार्गदर्शनामधून छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान सांगितले. अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासातील विविध पैलू उलगडून दाखवले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पूजा पाटील, प्रा. कैलास सिंह राजपूत, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.संपदा शिंदे यांनी केले.
पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
