| मुंबई | वृत्तसंस्था |
निवडणुका आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोयीस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. मोठा भाऊ म्हणून आदर करु, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतलं जाणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आम्हाला फार लांब नाही, असा सूचक इशाराही दिला. ते नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. नवी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. दरम्यान, ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
निवडणुका आल्या की शिवसेना मनमानी करते; जितेंद्र आव्हाडांचा आरोप
