उद्या शिवसेनेच्या निष्ठावंत आणि बंडखोरांचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन

दोन्ही गटांच्या मेळाव्यांचे आयोजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात अस्थिरता निर्माण झाली असून राज्यभरात बंडखोर आणि निष्ठावंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठया प्रमाणावर खटके उडत असल्याने पोलिस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. अशातच मंगळवार दिनांक 28 जून रोजी अलिबाग मध्ये रायगड जिल्ह्यातील निष्ठावंत आणि बंडखोर अशा दोन्ही गटातील शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अलिबागमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार सहभागी झाले आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या तिघांचाही यात समावेश आहे. शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षासोबतच ठाम रहात बंडखोरांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. पक्षप्रमुखांनी देखील बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्याकडील जिल्हाप्रमुखपद काढुन घेत त्यांच्या जागी निष्ठावंत असलेले जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे. तर तालुकाप्रमुख राजा केणी यांची देखील हकालपट्टी करीत त्यांच्या जागी शंकर गुरव यांच्यावर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. तसेच सहसंपर्क प्रमुख पदी किशोर जैन यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता सरळसरळ दोन गट पडले आहेत.

याच पार्श्‍वभुमीवर निष्ठावंत शिवसैनिकांच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक 28 जुन रोजी दुपारी 2.30 वाजता भाग्यलक्ष्मी हॉल, अलिबाग येथे करण्यात आले आहे. शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात संपर्क प्रमुख बबन पाटील, संपर्क प्रमुख विलास चावरी, संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, महिला संपर्क संघटिका शितल म्हात्रे, सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, अलिबाग-मुरुड विधानसभा संघटक सतीश पाटील, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, सहसंपर्क संघटिका शिल्पा घरत, उपजिल्हा संघटिका दर्शना पाटील, अलिबाग महिला शहर संघटिका तनुजा पेरेकर आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, आजी माजी सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे आमदार महेंद्र दळवी समर्थक यांना समर्थन देण्यासाठी मंगळवार दि0 28 जुन रोजी सकाळी 10.30 वाजता अलिबाग रेवस बायपास, चेंढरे येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहेत. या दोन्ही मेळाव्यांची जय्यत तयारी सुरु असून शहरात काही अनूचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version