| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले होते. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (दि.14) सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुख्य याचिकेवर निर्णय करणे योग्य राहील, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीवेळी म्हटले. याप्रकरणी सुनावणी पुढे ढकलताना ऑगस्ट महिन्यातील तारीख देऊ. तोपर्यंत जर निवडणुका लागल्या, तर निवडणूक लढा, असेही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीवेळी स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. परंतु, या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. एकनाथ शिंदे यांच्यावतीने मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. तर, ठाकरे गटाची बाजू रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी मांडली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मुख्य सुनावणी सुरू करण्यास सांगितल्यानंतर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यात या सुनावणीसाठी तारीख द्यावी, अशी विनंती केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने वेळापत्रक तपासून सुनावणीची तारीख कळवतो, तोवर जर निवडणुका लागल्या तर तुम्ही निवडणूक लढा, असेही न्यायमूर्तींनी सांगितले. त्यामुळे पुढील सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.