जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्वबळाचा नारा

विनायक राऊतांनी दिला इशारा
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील सहकार क्षेत्र तथा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांमध्ये जर महाविकास आघाडीतर्फे किंवा अन्य आघाडी न झाल्यास शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा इशारा खा.विनायक राऊत यांनी दिला आहे. वेंगुर्ले येथे आयोजित तालुका पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी केंद्रशासनावर ताशेरे ओढत राऊत म्हणाले की, कोरोनामुळे एका बाजूने नोकर्‍या गेल्या, उद्योगधंदे बंद झाले तर दुसर्‍या बाजूला पेट्रोल, डिझेलचे भाव भडकले. यातून केंद्रसरकार जनतेला लुबाडण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याप्रमाणेच, प्रस्तावित जिल्हाशासकीय वैद्यकीय रूग्णालायच्या महाविद्यालयास मंजूरी मिळाली असून, त्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये तसेच नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला या शासकीय महाविद्यालयाचा त्रास होऊ नये, यासाठीच राणे आपल्या पदाचा गैरवापर करत, केंद्रातून संबंधित कामात आडकाठी निर्माण करण्याचे काम करत असल्याचाही पुनरूच्चार याप्रसंगी राऊत यांनी केला.
यासंदर्भात पुढे राऊत म्हणाले की, काहीही असोोणत्याही परिस्थितीत हे शासकीय महाविद्यालय चालू करून येथील गोर गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, गरज पडल्यास न्यायालयाच्या माध्यमातून हे महाविद्यालय चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी 67 नवीन अम्ब्युलस प्राप्त झाल्या आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या नाकर्तेपणामुळे त्यात डिझेल भरण्यास पैसे नाहीत, हा या जिल्हा परिषदेचा कर्मदळीद्रीपणा आहे, असा टोला लगावा. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.
याप्रसंगी संजय पडते, यशवंत परब, अजित राऊळ, राजू शेट्ये, रुपेश पावसकर, बाळा दळवी, सुनील डुबळे, सचिन वालावलकर, सचिन देसाई, सुनील मोरजकर, सुकन्या नरसुले, मंजूषा आरोलकर, सागर नाणोसकर, पंकज शिरसाट, प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर, विवेकानंद आरोलकर, संजय गावडे, निलेश चमणकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version