प्रतीक्षा तांडेल ठरली सर्वोत्तम खेळाडू
। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवशक्ती महिला संघाने चंद्रोदय क्रीडा मंडळ आयोजित महिला गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जेतेपद पटकाविले. शिवशक्तीची प्रतीक्षा तांडेल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिला सायकल व चषक देऊन गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणसंग्राम रणरागीणींचा या अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभादेवी येथील मुरारी घाग मार्गावरील स्व. दिनकर खाटपे क्रीडांगणावर शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने डॉ. शिरोडकर संघाचा 27-24 असा पराभव करीत स्व. शोभा रामचंद्र पाटील चषक व 7 हजार पटकाविले. उपविजेत्या शिरोडकरला स्व. यशवंत कोठेकर चषक व रोख 5 हजारावर समाधान मानावे लागले. पूर्वार्धात शिवशक्तीने आक्रमक सुरुवात करीत 17-08 अशी भक्कम आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र डॉ.शिरोडकरने आपल्या खेळाची गती वाढवीत शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली. पण विजयापासून मात्र 3 गुणांनी त्या कमी पडल्या. प्रतीक्षा तांडेल, साक्षी रहाटे, प्राची भादवणकर, साधना विश्वकर्मा, रिद्धी हडकर यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाला शिवशक्तीच्या विजयाचे श्रेय जाते. उत्तरार्धात संयम आणि सावधपणाचे योग्य तंत्र वापरून शिवशक्तीने हा सामना आपल्या पारड्यातच फिरविला. साक्षी सावंत, तेजश्री पोटे यांनी सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली. पण विजय त्यांच्या हातून निसटला.
डॉ. शिरोडकरची तेजश्री पोटे आणि साक्षी सावंत स्पर्धेतील अनुक्रमे उत्कृष्ट पकड आणि चढाईच्या खेळाडू ठरल्या. दोघीना आकर्षक भेटवस्तू आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्तम खेळाडूसह चढाई-पकडीची पारितोषिके स्व. सुनील मोकल यांच्या स्मृती प्रित्यर्थ वैशाली मोकल, सचिन बिडवे, हेमंत पाटील यांच्याकडून देण्यात आली.