माजी राज्यमंत्री तुपकर यांचा हल्लाबोल
| पनवेल | वार्ताहर |
राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजप यांच्यात सुरु असलेल्या राजकीय वादावादीमुळे सर्वसामान्यांचे बेहाल सुरु असल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यानी केला आहे. पनवेल तालुक्यातील बेलपाडा येथे श्री क्षेत्र वल्डेश्वर मंदिराच्या कलशपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू, मुख्याध्यापक दत्ता कोळी, नीलम मधुकर कडू, सुजय कडू, मानव कडू यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
रविकांत तुपकर पुढे म्हणाले की, महाराषट्रातील सगळ्याच प्रस्थापित पक्षांची भांडणं पाहून सर्वसामान्य माणसाला कंटाळा आला आहे. प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांच्या भांडणामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजुला राहिले आहेत. शेतकरी-कष्टकरी आत्महत्या करतोय, मजुर आत्महत्या करतोय, शेतकर्यांची मुलं आत्महत्या करत आहेत. ग्रामीण भाग उध्वस्त झालाय. सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं आहे. व्यापारी उद्योजक कोरोनाच्या काळात अडचणीत आहेत. या सर्व प्रश्नांवर कुठेच चर्चा होताना दिसत नाही. प्रत्येकाला फक्त सत्ता पाहिजे आहे. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता असे सगळे सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अत्यंत खाली गेलेला आहे,अशी टीकाही त्यांनी केली. सगळ्या पक्षांपासून समान अंतरावर राहायचं, असा विचार करीत आहोत. आणि भविष्यात महाराष्ट्राला एक नवा पर्याय द्यायचा प्रयत्न राहील. लोकांच्या मनामध्ये प्रस्थापित पक्षांबद्दल राग तयार होत आहे. लोक चांगल्या पक्षाच्या शोधत आहेत. असा एखादा सक्षम पर्याय महाराष्ट्राच्या राजकारणात देता येतो का या दृष्टीने आमच्या चर्चा सुरू असल्याचे तुपकर म्हणाले.
महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांची परंपरा आहे. असे असूनही प्रस्थापित पक्षांकडून घाणेरडे राजकारण होत आहे. याचा आम्हाला खेद वाटतो. या प्रस्थापित राजकीय पक्षांकडून तरुण पिढीने काय आदर्श घ्यायचा? एकाने घाणेरड्या शिव्या द्यायच्या, दुसर्याने चौकशी लावायची.
रविकांत तुपकर,माजी राज्यमंत्री
अन्यथा राज्यातही पंजाबची पुनरावृत्ती
सगळ्या प्रस्थापित पक्षांनी चिंतन करावे. अन्यथा पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा लोकांनी पर्याय म्हणुन स्वीकार केला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनता सगळ्या प्रस्थापित पक्षांना बाजुला ठेवून नवा पर्याय शोधतील आणि स्वीकारतील. त्यामुळे प्रस्थापितांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे, असे मत देखील तुपकर यांनी व्यक्त केले.