वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांची भेट
| अलिबाग | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांची अलिबागमध्ये जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्यदिव्य असा शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. मावळा प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाला तरुणांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महाराजांच्या काळातील शस्त्रसाठ्याची माहिती या निमित्ताने अलिबागकरांना मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भरविण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाला शुक्रवारी (दि.6) सायंकाळी अलिबाग नगरपरिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्यासह ॲड. प्रवीण ठाकूर, पोलीस निरीक्षक किशोर साळे, नगरसेवक ॲड. ऋषीकेश माळी, समीर ठाकूर, अभय म्हामुणकर यांच्यासह अनेकांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तलवार, भाले, तोफा, दांडपट्टा अशा अनेक प्रकारच्या शस्त्रांना प्रत्यक्षात पाहण्याची संधी या निमित्ताने अलिबागकरांना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनाला हजारो जणांनी भेट दिली. शिवकालीन शस्त्रांची ओळख पटवून घेतली. त्यांची माहिती आत्मसात करून घेतली. तरुणांनीदेखील या प्रदर्शनात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळा प्रतिष्ठानतर्फे अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला अलिबागमधील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.







