शिवज्योत रॅलीने अलिबाग दुमदुमले; जे.एस.एम कॉलेज यांचे आयोजन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन. याच दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता व महाराज रयतेचा राजा म्हणून सिंहासनाधिन झाले होते. हाच दिवस आज जे. एस. एम. कॉलेजमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरूवात करण्यात आली. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.


यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून पनवेल येथील कोकण विभागीय सहसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी चंद्रकांत खामकर हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील व कार्यक्रम अधिकारी डॉ. मिनल पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सुरुवात पालखी खांद्यावर घेऊन अ‍ॅड.गौतम पाटील व डॉ. अनिल पाटील यांनी केली. यानंतर अलिबाग शहरातून ढोल-ताशा पथकाच्या साथीने शिवज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले. शिवज्योत मिरवणुकीने संपूर्ण अलिबाग शहर दुमदुमले. सर्व इमारतींच्या गच्ची व खिडक्यांमधून लोक शिवाजी महाराजांना अभिवादन करत होते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व सांस्कृतिक कार्यक्रम विभागातर्फे ह्या शिवज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शिवस्वराज्य दिनाचा मुख्य कार्यक्रम महाविद्यालयाच्या अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ येथे झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. जयेश म्हात्रे यांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा आधार घेऊन त्यांच्या राजनैतीक कौशल्यांवर विवेचन केले. तर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिक पाटणकर यांने आपल्या खास शैलीत शिवचरित्र सादर केले. एन. एस. एस. स्वयंसेवक प्रशांत शिंदे याने छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता सादर केली तर वेदांती पाटील हिने छत्रपतींबद्दल आपले विचार मांडले, साहिल चौलकर याने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.

Exit mobile version