रायगडातील 64 केंद्रचालक आर्थिक संकटात
दोन लाख गरजूंच्या भोजनाचा प्रश्न ऐरणीवर
| खरोशी | धनाजी घरत |
गोरगरीब आणि गरजू नागरिकांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण देणाऱ्या शिवभोजन केंद्रांवरच आता आर्थिक संकट ओढवले आहे. रायगडातील 64 शिवभोजन केंद्रांना तब्बल महिनोन्महिने अनुदान मिळाले नसल्याने केंद्रचालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून केंद्रे सुरू ठेवण्याची वेळ काही चालकांवर आली असून, निधीचा प्रश्न लवकर सुटला नाह तर या योजनेवर अवलंबून असलेल्या सुमारे 2 लाख गरीब व गरजू नागरिकांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
समाजातील गरीबातला गरीब व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी झुणका-भाकर केंद्रे उभारली होती. त्याच धर्तीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन केंद्रे सुरू करून गोरगरीब जनतेच्या भोजनाची व्यवस्था केली. कोरोना काळात तत्कालीन राज्य सरकारने शिवभोजन मोफत देऊन गरजू नागरिकांना आधार दिला होता.
सध्या रायगड जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांमधून दररोज सुमारे 2 लाख गरीब व गरजू नागरिकांना भोजनाचा लाभ मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका थाळीसाठी नागरिकांकडून केवळ 10 रुपये आकारले जातात. राज्य शासनाकडून शहरी भागातील केंद्रांना प्रति थाळी 40 रुपये, तर ग्रामीण भागातील केंद्रांना 25 रुपये अनुदान दिले जाते. यासाठी वर्षाला सुमारे 270 कोटी रुपये शासनाकडून खर्च करण्यात येतात.
रायगड जिल्ह्यात 64 शिवभोजन केंद्रे कार्यरत असून, 8 हजार दैनंदिन थाळ्यांना मंजुरी आहे. थाळ्यांच्या वितरणानुसार केंद्रांना दरमहा साधारण 57 लाख रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता असते. मात्र, नोव्हेंबर 2025पासून म्हणजेच मागील 10 महिन्यांपासून राज्य शासनाकडून या केंद्रचालकांना एकही रुपया मिळाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रे कशी चालवायची, असा प्रश्न चालकांसमोर उभा राहिला आहे. काही केंद्रचालकांनी कर्ज काढून, तर काहींनी दागिने गहाण ठेवून केंद्रे सुरू ठेवली आहेत.
पनवेल तालुक्यात पूर्वी 19 शिवभोजन केंद्रे होती. त्यापैकी दोन केंद्रे वेळेवर अनुदान न मिळाल्यामुळे बंद पडल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इतर केंद्रांवरही संकटाची टांगती तलवार आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील पलूस येथील शिवगंगा शिवभोजन केंद्राचे संचालक संजय पाटील व मनीषा संजय पाटील या दाम्पत्याने 6 सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. आर्थिक अडचणींमुळे शिवभोजन केंद्र चालकांवर वाढता ताण अधोरेखित होत असताना रायगडमधील केंद्रांच्या थकीत अनुदानाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
सुधागडमध्ये 13 महिन्यांपासून प्रतीक्षा?
पनवेल तालुक्यातील केंद्रांना अद्याप 10 महिन्यांचे अनुदान मिळाले नसल्याचे सांगण्यात येत असताना, सुधागड तालुक्यातील तीन शिवभोजन केंद्रांना मागील 13 महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याचा दावा केंद्रचालकांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातील कर्मचारी दीपक मुळे यांनी पनवेल तालुक्यातील केंद्रांची बिले उशिरा आल्याने काही केंद्रांचे पैसे अदा करणे राहिले असल्याचे सांगितले.
3 सप्टेंबर 2026 रोजी शिवभोजन केंद्रांची मे 2026 पर्यंतची देयके अदा करण्यासाठी 3 कोटी 77 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून, शिवभोजन केंद्रांची देयके देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच मे महिन्यानंतरची अनुदानाची रक्कम पुढील निधी प्राप्त झाल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे.
– डॉ. रवींद्र शेळके, उपजिल्हाधिकारी, रायगड
