कुलाबा किल्ला ते नेरळ अंतर एका रात्रीत केले पार
। नेरळ । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त नेरळ गावातील शिवप्रेमी तरुण दरवर्षी महाराजांच्या एखाद्या गड किल्ल्यावरून शिवज्योत दौड घेवून येत असतात. यावर्षी या शिवप्रेमी तरुणांनी रात्रभर धावत कुलाबा किल्ला ते नेरळ हे 90 किलोमीटर अंतर पार केले. दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शिवज्योत दौड महाराजांचे गड किल्ल्यावरून आणली जाते. गतवर्षी तब्बल पावणे तीनशे किलोमीटर अंतरावरून किल्ले अजिंक्यतारा येथून शिवज्योत दौड नेरळ येथे आणण्यात आली होती.
अलिबाग येथील समुद्रात असलेल्या कुलाबा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या आरमारात कुलाबा किल्ला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे महत्त्व मोठे राहिले आहे. त्यामुळे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत असताना किल्ले कुलाबा येथून शिवज्योत दौड आणण्याचा संकल्प निश्चित करण्यात आला. त्यासाठी नेरळ शिवजयंती उत्सव समिती आणि शिवज्योत दौड समिती यांच्या माध्यमातून (दि.27) मार्च सायंकाळी कुलाबा किल्ल्यात विधिवत पूजाअर्चा करून श्याम कडव यांच्या नेतृत्वाखाली 16 तरुण हे नेरळ कडे निघाले.कुलाबा किल्ल्याच्या बाहेर पडल्यावर तेथून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरळ गावात हे तरुण सकाळी शिवज्योत दौड घेवून पोहचले.
कुलाबा किल्ला अलिबाग ते नेरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक हे अंतर 90 किलोमीटर असून देखील शिवप्रेमी तरुणांनी रात्रभर रस्त्याच्या कडेने पेटती मशाल घेवून नेरळ गाठले. त्यांच्या सोबत असलेल्या टेम्पो मधून शिवरायांची गाणी वाजवली जात होती. या शिवज्योत दौडची रात्रीची वेळ असताना जागोजागी स्वागत करण्यात येत होते. किल्ले कुलाबा ते नेरळ या शिवज्योत दौडमध्ये श्याम कडव, राहुल साळुंके, तुषार भोईर, भूषण भोईर, दुर्वांकुर पवार, कुणाल कांबरी, कामेश कांबरी, राजेश हाबळे, संतोष राठोड, जीवन भोईर, महेंद्र शेळके, वैभव कांबरी,भावेश भोईर, प्रथमेश कर्णिक, कल्पेश म्हसे, निलेश ठोंबरे, सुरज कदम आदी शिवप्रेमी तरुण सहभागी झाले होते. आज सकाळी नेरळ येथे आल्यावर या तरुणांचे शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि नेरळ गावातील ग्रामस्थ यांनी स्वागत केले. या आधी गतवर्षी सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला ते नेरळ असा पावणे तीनशे किलोमीटर प्रवास या तीन रात्री शिवज्योत प्रवास करून नेरळ येथे आणण्यात आली होती. तर त्या आधी किल्ले शिवनेरी, किल्ले रामशेज अशा ठिकाणावरून शिवज्योत आणण्यात आली आहे.