श्री स्वामी समर्थची विजयी सलामी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने दादर (पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर शिवनेरी सेवा मंडळ आयोजित 56व्या कबड्डी महोत्सवाला सुरूवात झाली आहे. या कबड्डी स्पर्धेला श्री स्वामी समर्थ गोलफादेवी प्रतिष्ठान यांच्या महिला गटातील विजयाने प्रारंभ झाला. यावेळी कुमार गटात साऊथ कॅनरा, श्रीराम विश्वस्त, शिवमुद्रा, विजय क्लब यांनी विजयी सलामी दिली.
शिवनेरी सेवा मंडळ आयोजित कबड्डी महोत्सवात श्री स्वामी समर्थने उदघाटनीय सामन्यात शताब्दी स्पोर्ट्सचा 36-09 असा सहज पराभव केला. स्वामी समर्थने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात 2 लोण देत 23-05 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपली आघाडी वाढविली. शेवटी 26 गुणांच्या मोठ्या फरकाने आपला विजय साकारला. दुसर्या सामन्यात गोलफादेवी प्रतिष्ठानने अमर भारतला 42-21 असे नमविले. विश्रांतीला 24-09 अशी आघाडी घेणार्या गोलफादेवीला नंतर मात्र अमर भारतने बर्यापैकी लढत दिली.
कुमार गटात साऊथ कॅनराने यंग प्रभादेवीचा 47-26 असा पाडाव केला. यंग प्रभादेवीकडून जयेश कोंढाळकरने एकाकी लढत दिली. श्रीराम विश्वस्तने अंकुश पारवे, अथर्व यांच्या चढाई पकडिच्या खेळाने सिद्धी प्रभा फाउंडेशनचा 40-24 असा सहज पराभव केला. शिवमुद्रा प्रतिष्ठानने अमर हिंद मंडळाला 41-21 असे नमवित आगेकूच केली. विजय क्लबने संस्कृती प्रतिष्ठान वर 40-24 असा विजय मिळविला. रोहन राज, शिवम यादव यांच्या चतुरस्त्र खेळाने विजय क्लबने पूर्वार्धात 21-14 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम राखत 16गुणांनीआपला विजय साकारला. इतर सामन्यात नवोदित संघाने विजय बजरंग व्यायाम शाळेला 43-30 असे, तर एस.एस.जी. फाउंडेशनने गुड मॉर्निंगला 47-35 असे पराभूत करीत आगेकूच केली.