| मुरुड -जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था, कोकण कडा मित्र मंडळ रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थांच्या वतीने आज 17 वा पद्मदुर्ग जागर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या शिवशाही सोहळ्या करिता पर्यटकांसह शेकडो शिवप्रेमी यांनी पद्मदुर्ग किल्ल्यावर हजेरी लावली. यावेळी सकाळी शिवप्रेमी यांनी डोक्यात भगवे फेटे घालून मुरुड राधाकृष्ण मंदिरा पासुन शिवपालखीला सुरुवात करण्यात आली.
राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जयभवानी जय शिवाजी, हर हर महादेव, कोटेश्वरी मातेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता ही पालखी खोरा बंदरा पर्यत आणण्यात आली. त्यानंतर बोटीने पालखी पद्मदुर्ग किल्लात आणण्यात आली. सकाळपासून शिवप्रेमी यांनी किल्ल्यात येऊन पुन्हा किल्ला स्वच्छ व चकाचक करण्यात आला. त्यानंर संपुर्ण गडाला फुलांने सजवले. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले.यामुळे भगवेमय वातावरण तयार झाले होते.
सकाळी 09.30 वाजता अच्युत चव्हाण व त्यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण यांच्या शुभ हस्ते गडाची श्री. कोटेश्वरी मातेची पूजन करण्यात आले. डॉक्टर मयुर कल्याणी व त्यांच्या पत्नी डॉक्टर भाविका कल्याणी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. व शिवप्रतिमेला मुद्रांचा अभिषेख करण्यात आले. मंत्राच्या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला. सारे वातावरण शिवकालीन झाले होते. हजारो श्रोते कानी पडणारे मंत्र व व्याख्यान अगदी मन लावून ऐकत होते.
इतिहास अभ्यासक प्रतिक कालगुंडे यांनी शिवरायांची राजनीती व सर्वसमभाव सर्व जातीचे मावळे घेऊन स्वराज्य घडवले ते कसे त्यांच्या व्याख्यानात सांगितले. तसेच शिवरायांच्या राजनीती बाबत या चित्तथराक कथा सांगून शिवरायांचे मावळे बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड स्वराज्यासाठी कशी लढवली, याचे रोमहर्षक वर्णन करून शिवप्रेमीना एक नवा जोश निर्माण केला. तद्नंतर शिवप्रेमींनी विविध शिवकालीन शौर्याचे खेळ बाणापट्टा, तलवारबाजी, मल्लखांब, पारंपरिक गोंधळ सादर करण्यात आला.
यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, मुरूड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकुर, राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम, राहुल कासार, रुपेश जामकर, डॉक्टर मयुर कल्याणी, डॉक्टर भाविका कल्याणी, कोकण कडा मित्र मंडळ रायगड शेखर फरमन, रोहित पवार, उपाध्यक्ष संकेत वडके, सुरेश पवार, अनिकेत कदम, प्रकाश दाभेकर , विजय वाणी, प्रदिप बागडे, महेंद्र मोहिते, संदिप घरत, नेहा पाके, बाळा साखरकर, मिलिंद भगत, महेश साळुंखे, प्रविण पाटील, रुपेश रणदिवे, अच्युत चव्हाण, अनुराधा चव्हाण, अमित पाटील, सतेज विरकुड, प्रकाश वाडकर आदिंसह शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राज्य सरकार व केंद्र सरकार अरबी समुद्रात नवीन छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभे करत आहेत. त्याच्यापेक्षा महाराजांना मानवंदना द्यायची असेल तर मुरूड येथील समुद्रात असणारा महाराजांचा जीवंत पद्मदुर्ग किल्ल्याचे जतन व संवर्धन करा असे आवाहन केले. मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था, कोकण कडा मित्र मंडळ रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थांच्या वतीने पद्मदुर्ग सोहळा गेली 17 वर्ष करित आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून गड किल्ल्यांचे संवर्धन व जतनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या वास्तू आहेत. त्या पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ही करतात त्यांना मानाचा मुजरा. किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्याकरिता मी शिवभक्त म्हणून अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिवभक्तांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी प्रवासी जेट्टी पावसाळ्यादरम्यान सुध्दा शिवभक्त येथे कसे येतील त्याकरिता आम्ही प्रयत्न करणार आहे. मुरुड शहरात ही भव्य महाराजांचा स्मारक बांधा तसेच पद्मदुर्ग किल्ला शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी झाले पाहिजे.त्यासाठी सरकारला विनंती करणार आहोत.असे माजी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले.






