अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

क्षमता संपलेली ‌‘शिवशाही‌’ पुणे मार्गावर
घाटमाथ्यावर बस ठप्प, अलिबाग आगारात संतापाची लाट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मोठा गाजावाजा करत प्रवाशांच्या सोयीसाठी आणलेली वातानुकूलित ‌‘शिवशाही‌’ बस आता स्वतःच त्रासाचे कारण ठरत असल्याची धक्कादायक चर्चा अलिबाग आगारात सुरू आहे. आठ लाख किलोमीटरपेक्षा अधिक धावलेली आणि वारंवार बिघाड होणारी बस घाटमाथ्यावर चालण्यायोग्य नसतानाही पुणे मार्गावर पाठविण्याचा वरिष्ठांचा अट्टाहास सुरू असल्याचा आरोप कर्मचारी वर्गातून केला जात आहे. यामुळे शिंग्रोबा घाट चढताना बसची दमछाक होत असून, प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अलिबाग आगारातून दररोज सकाळी सहा वाजता पुण्यासाठी बस सुटते. पूर्वी या मार्गावर निम-आराम बस धावत होती; मात्र नवीन ‌‘शिवशाही‌’ दाखल झाल्यानंतर तिचीच नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. संबंधित बसने आठ लाख किलोमीटरचा टप्पा ओलांडला असून, तिची कार्यक्षमता घटल्याची चर्चा आहे. घाट चढताना इंजिनची ताकद कमी पडणे, एसी बंद पडणे, दरवाजे लॉक होणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांचा रोष चालक-वाहकांना सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, मुंबई-पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाट चढताना बसची क्षमता संपते, असे प्रत्यक्ष अनुभव सांगितले जात आहेत. तरीही मुंबईतील प्रादेशिक नियंत्रण समितीतील एका अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे हीच बस पुणे मार्गावर कायम ठेवली जात असल्याचा आरोप आहे. सकाळी सहा वाजता अलिबागहून निघालेली बस पुण्यावरून अकरा वाजता परतीस सुटते; मात्र घाटमाथ्यावर बिघाड झाल्यास वेळापत्रक कोलमडते. परिणामी प्रवाशांचा खोळंबा आणि कर्मचाऱ्यांवर ताण वाढतो. या मनमानी कारभारामुळे आगारातील कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.

एकूणच, प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा वरिष्ठांचा अट्टाहास महत्त्वाचा ठरत असल्याची टीका होत असून, कालबाह्य होत चाललेल्या ‌‘शिवशाही‌’ला पुणे मार्गावरून तातडीने हटवावे आणि पर्यायी सक्षम बसची व्यवस्था करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

‌‘शिवशाही‌’ कालबाह्य होण्याच्या वाटेवर
अलिबाग आगारात सध्या 11 शिवशाही बसेस कार्यरत आहेत. प्रामुख्याने अलिबाग-पनवेल विना थांबा सेवेसाठी त्यांचा वापर होतो; तर त्यापैकी एक बस पुणे मार्गावर धावते. मात्र, बहुतांश बसेसनी आठ लाख किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापले असून, त्या वारंवार बिघडत आहेत. एसी बंद पडल्यावर प्रवाशांचा जीव कोंडतो; इंजिन एसीचा भार पेलत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या बसेस लवकरच निम-आराम किंवा साध्या बसमध्ये रूपांतरित करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकेकाळी ‌‘लक्झरी‌’ म्हणून ओळखली जाणारी शिवशाही आता कालबाह्य होण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे.
डिजीटल तिकीट मशीनचा बोजवारा
कामकाज गतिमान करण्यासाठी महामंडळाने कागदी तिकिटाऐवजी डिजीटल मशीनचा वापर सुरू केला. एबीक्स कॅश कंपनीची ही तिकीट यंत्रे असल्याची माहिती आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या मशीन वारंवार बिघडत असल्याची तक्रार आहे. तिकीट प्रिंट होण्यास विलंब, बटणे दाबताना अडचणी, चार्जिंगची समस्या, मशीन गरम होणे, अशा त्रुटींमुळे वाहकांची अडचण वाढली आहे. प्रवाशांसमोर उभे राहून स्पष्टीकरण देताना कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Exit mobile version