अरविंद म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने घेतला आढावा; प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे प्रशासनाचे आश्वासन
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून निर्माण झालेल्या नागरी समस्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे रुग्णांची व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे शेकापचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिष्टमंडळाने रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली.
पनवेल उपजिल्हा रूग्णालयात स्वच्छतेचा फज्जा उडाला असून, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे याठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याशी होणारा खेळ रोखण्यासाठी शिष्टमंडळाने उपजिल्हा रूग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील स्वच्छतागृहे आणि बाथरूमची झालेली दुर्दशा, पसरलेली दुर्गंधी आणि दैनंदिन स्वच्छतेचा उडालेला फज्जा यावर विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, रुग्णालयातील ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
त्याचबरोबर 2024 पासून रुग्णालयात पडून असलेले बेवारस मृतदेह या चर्चेतील सर्वांत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय ठरला. या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीबाबत प्रशासकीय दिरंगाईवर म्हात्रे यांनी डॉ. शिवाजी पाटील यांच्याकडे जाब विचारला. या गंभीर मुद्द्यावर तात्काळ कठोर पावले उचलत, बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधीक्षकांनी दिले. तसेच, रुग्णालयातील ड्रेनेज लाईनचा गंभीर विषय महापालिकेच्या माध्यमातून तातडीने दुरुस्त करून मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या पाहणी दौऱ्यात आणि बैठकीत विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्यासमवेत महापालिकेतील गटनेते केतन भगत, नगरसेविका मनिषा अनंता म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते अनंता म्हात्रे, अल्पसंख्यांक विभागाचे गजंफर नावडेकर, जावेद कच्छी यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
