जयंत पाटील व चित्रलेखा पाटील यांनी प्रकृतीची विचारपूस करून व्यक्त केल्या सदिच्छा
| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आणि शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीर्घ काळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शरद पवार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी शेकाप नेत्यांनी गुरुवारी (दि.5) शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन त्यांनी पुन्हा सक्रियपणे सार्वजनिक जीवनात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
शरद पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि मार्गदर्शक नेतृत्व आहे. अनेक दशकांपासून त्यांनी राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला नेहमीच लाभ झाला आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, हीच मनापासून सदिच्छा. त्यांनी पुन्हा एकदा त्याच उत्साहाने सार्वजनिक जीवनात सक्रिय व्हावे आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभत राहावे, अशी अपेक्षा.
जयंत पाटील,
सरचिटणीस, शेकाप
