स्मार्ट मीटरला शेकापचा विरोध

| बोर्ली पंचतन | प्रतिनिधी |

महाराष्ट्रात महावितरणमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला भारतीय शेतकरी कामगार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. सक्तीने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना भरमसाठ वीजबिले येत असल्याचा आरोप करत ही वाढीव बिले तातडीने माफ करावीत, अशी मागणी पक्षाने केली आहे. स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची पूर्वपरवानगी घेतली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, वीज कायदा 2003 आणि न्यायालयीन निर्णयांचा हवाला देत स्मार्ट मीटर बसविणे ही ऐच्छिक बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्राहकांना मीटरच्या अचूकतेबाबत शंका असल्यास पडताळणीसाठी स्वतंत्र चेक मीटर देण्याची तरतूद असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात अनावश्यक वाढ होत असून, ही ग्राहकांची आर्थिक लूट असल्याचा दावा शेकापने केला आहे. सक्तीची स्मार्ट मीटर योजना तात्काळ थांबवून ग्राहकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही पक्षाने दिला आहे.

Exit mobile version