। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
आपटवणे ग्रामपंचायतीमधील कामे ही शेकापच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. या गावचा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या गावाची सरपंच कर्तबगार आहे. या तालुक्यातील महिला नेहमी पक्षाच्या कामात आघाडीवर असतात. मी या ठिकाणी आपटवणे येथील निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी आलो आहे. युती आघाडी कोणाची होईल ते माहीत नाही; पण शेतकरी कामगार पक्षाशिवाय जिल्हा परिषद येणार नाही. या मतदारसंघात आजपर्यंत शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांने उमेदवाराला निवडून देण्याचा इतिहास केला आहे.यामुळे शेकाप संपला असे बोलणाऱ्यांना शेकापच धडा शिकवेल, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
सुरेश खैरे यांच्या रूपाने शेकापला कार्यक्षम जिल्हा चिटणीस मिळाला. सुरेश खैरे यांचे कौतुक म्हणजे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे कौतुक आहे. ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांनाच विरोधकांनी जवळ केले. मात्र शेकाप हा निष्ठावंतांचा पक्ष आहे. मला तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले की, मला तरुण झाल्यासारखे वाटते. मी या गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. आपल्याला जिल्हा परिषद जिंकायची आहे. जो उमेदवार असेल त्याचे भवितव्य उज्वल असेल. जो पडत्या काळात आपल्याबरोबर आहे, त्यांना मी कधीच विसरत नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या पूजेच्या कार्यक्रमाला बोलावले त्याबद्दल जिल्हा सरचिटणीस जयंत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. या पूजेनिमित्त गणेश पूजन पुण्यवाचन,मातृकापूजन, प्रवचन,हरिपाठ,किर्तन, भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या पूजेनिमित्त जयंत पाटील, जिल्हा चिटणीस शेकाप सुरेश खैरे,सरपंच आपटवणे अस्मिता बैकर,तालुका चिटणीस अतिष सागळे,खरेदी विक्री संघ चेअरमन किसन उमटे,तालुका सहचिटणीस प्रवीण कुंभार,महिला आघाडी अध्यक्ष समृद्धी यादव,मा पंचायत समिती सदस्य सविता हंबीर,पाली शहर आघाडी प्रमुख ऋतुजा मेहता तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी तसेच आपटवणे,मुंबई, ठाणे,पुणे,लोणावळा येथील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
आपटवणे गाव हे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचे आहे.या गावातील कार्यकर्ते हे शेकाप बरोबर निष्ठावंत आहेत. गावाच्या विकासासाठीच्या योजना शेकापने राबविल्या आहेत.
या गावाच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाला नेहमी मताधिक्य दिले आहे. येणाऱ्या निवडणुकीतदेखील मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही सुरेश खैरे यांनी दिली.आपटवणे गावचा विकास शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून लोकनेते सुरेश खैरे यांनी केला आहे, असे आपटवणेच्या सरपंच अस्मिता बैकर यांनी सांगितले.
आपटवणे गावचा विकास शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून लोकनेते सुरेश खैरे यांनी केला आहे, असे आपटवणेच्या सरपंच अस्मिता बैकर यांनी सांगितले.
