| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचा मृतदेह कचराकुंडीत सापडला आहे. या महिलेची हत्या तिच्या पतीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. ही महिला गेल्या काही दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक माध्यमांमुळे ही घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय महिला चैतन्या मधागनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुंटुंबासोबच ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. ती मुळ हैदराबाद येथील आहे. या महिलेचा मृतदेह शनिवारी एका रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचराकुंडीत आढळला. चैतन्या मधागनी हिचे पती अशोक राज हा आपल्या ५ वर्षाच्या मुलासह ५ मार्चला भारतात आला होता. तेव्हापासूनच चैतन्या मधागनी बेपत्ता होती. ती गेल्या काही दिवसांपासून कोणच्याही संपर्कात नसल्याची माहिती मिळाली. उप्पलचे आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांनी सांगितले की, ही महिला त्यांच्या भागातील होती आणि त्यांनी त्या महिलेच्या कुटुंबाचीही भेट घेतली आहे. रेड्डी म्हणाले महिलेच्या पालकांच्या विनंतीवरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला महिलेचा मृतदेह भारतात आणण्यासाठी पत्रही लिहिले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनाही कळवले असल्याचे आमदाराचे म्हणणे आहे.