। बीड । वृत्तसंस्था ।
शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणात सीआयडीच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. त्यानंतर सीआयडीने विनायक मेटे यांचा वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रसायनी पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०४ (२) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना तपासात विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही याप्रकरणी मतं घेतली गेली. या समितीत आयआरबीचे अभियंता आणि इतरांचा समावेश होता.
सीसीटीव्हीत नेमकं काय आढळलं?
सीआयडीने केलेल्या सीसीटीव्ही तपासणीत विनायक मेटेंच्या चालकाने तासी १३०-१४० किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याचं समोर आलं आहे. याशिवाय गाडीचा अपघात होण्याआधी चालक एकनाथ कदमने दुसरी गाडी ओव्हरटेक करत असतानाही आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. जागा नसतानाही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाला, असंही या तपासात समोर आलं आहे.
या प्रकरणात रसायनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर लवकरच सीआयडी आरोपी चालक एकनाथ कदमला अटक करण्याची शक्यता आहे.