| नाशिक | प्रतिनिधी |
वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले आणि नंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली आहे. या घटनेत सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील 42 वर्षीय गणेश सखाहरी चत्तर हे 8 जूनपासून बेपत्ता होते. त्याच दरम्यान शिर्डी जवळील नांदुर्खी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल 13 जून रोजी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
मयत व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला. दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला आणि त्यानंतर या खुनाला वाचा फुटली. गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना उसाच्या कांडक्याने तसेच हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाइल काढून घेतला. हा मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला. पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सात अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







