मृतदेह खोक्यात भरून माथेरान घाटात फेकला
| नेरळ | बातमीदार |
मुंबई जुहू येथील विना प्रभुवनदास कपूर या हरवल्या असल्याची माहिती त्या राहत असलेल्या सोसायटीचे रखवालदार याने जुहू पोलीस ठाणे येथे जाऊन दिली होती. त्यांनतर पोलिसांनी त्यांचा मुलगा आणि त्यांचा नोकर यास ताब्यात घेतले असता, चौकशीमध्ये त्या दोघांनी विना कपूर यांचा मृतदेह माथेरान घाटात फेकून दिला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार नेरळ येथे आल्यानंतर जुहू पोलीस यांच्या मदतीने घाटाच्या सुरुवातीला हुतात्मा चौकाच्या परिसरातून मृतदेह ताब्यात घेतला.
विना प्रभुवनदास यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा अमेरिकेत असतो आणि दुसऱ्या मुलगा सचिन याची विना कपूर यांच्या मालमत्तेची सतत भांडणे होत होती आणि त्यांची न्यायालयात केस सुद्धा सुरु होती. जुहू येथील माउली सोसायटी मध्ये राहणाऱ्या या हरवल्या असल्याची तक्रार त्या इमारतीचा रखवालदार यांच्या कडून दि. 7 सकाळी जुहू येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर जुहू पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून विना कपूर यांचा मुलगा सचिन आणि त्याचा नोकर छोटू यास ताब्यात घेतले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित वर्तक यांनी पोलीस खाक्यानुसार चौकशी केली असता, आपणच आपल्या वयोवृद्ध आईला दि. ६ डिसेंबर रोजी लाथाबुक्क्यांनी आणि बेस बॉलच्या बॅट ने मारले असल्याचे काबुल केले. त्यांचा मृतदेह कोणालाही संशय येऊ नये यासाठी मोठ्या खोक्यामध्ये भरून नेरळ-माथेरान घाट रस्त्यात दरीमध्ये फेकून दिला असल्याचे काबुल केल्यावर मुंबई जुहू येथील पोलीस नेरळ येथे सायंकाळी सात वाजता पोहचले.
जुहू पोलिसांनी नेरळ पोलिसांच्या मदतीने आरोपी सचिन कपूर आणि त्याचा नोकर छोटू सह माथेरान घाटाचा रस्ता प्रवास सुरु केला. मात्र माथेरान घाट सुरु होतो त्या हुतात्मा चौकातून जेमतेम ५० मीटर अंतरावरील आंब्याच्या झाडाच्या खाली झाडीमध्ये मृतदेह फेकून दिला असल्याची जागा दाखवली. त्यांनतर पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी भिंतीच्या खाली उतरून काही मीटर अंतरावरून तो विना कपूर यांचा मृतदेह असलेला खोका उचलून बाहेर काढला. त्यात विना कपूर यांचा मृतदेह असल्याने तो खोका रुगवाहिकेत भरून मुंबई साठी रात्री सव्वा नऊ वाजता मुंबई पोलीस रवाना झाले.