| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या मांगरूण या गावात वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्यावरून सावत्र काकानेच आपल्या पुतणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. डोक्यात कोयत्याने वार केल्याने सदरची महिला गंभीर जखमी झाली असून, ही घटना सोमवार दि.2 दुपारच्या वेळी घडली आहे.
संगीता तुकाराम शिंदे रा. मांघरूण या घरी पायरीवर बसल्या होत्या. त्या वेळी त्यांचा सावत्र चुलता शांताराम गेणु शिंदे रा. मांघरूण हा त्या ठिकाणी आला आणि वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची मागणी करत संगीता यांना शिवीगाळी-दमदाटी करून त्यांच्या अंगावर धावत जाऊन हातात असलेल्या कोयत्याने डोक्यावर वार केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात संगीता या गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपी शांताराम शिंदे यांच्या विरोधात महाड औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास स.पो.नि.एम एस आंधळे करत आहेत.