। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यातील शेकापचे युवा नेते बबन विश्वकर्मा यांचे गोल्डीसोबत अतिशय संवेदनशील नाते होते. कुटूंबातील सदस्याप्रमाणे ते त्याच्यावर प्रेम करीत होते. अत्यंत जवळच्या अशा गोल्डी नावाच्या कोंबड्यावर विषप्रयोग करण्यात आला असून खारघर येथे दोन वर्षांच्या मांजरीची हत्या करण्यात आल्याने पशुप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे युवा नेते बबन विश्वकर्मा यांना प्रिय असणार्या कोंबड्यावर विषप्रयोग झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये त्यांनी गेले नऊ महिन्यापासून जिवापाड सांभाळलेल्या गावठी कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. गोल्डीच्या खणखणीत आवाजात बांग ऐकल्यावरती नेहमी बबन विश्वकर्मा यांना जाग येत असे. त्या दिवशी देखील अशीच बांग ऐकल्यानंतर बबन विश्वकर्मा पहाटे उठून आपल्या नित्यक्रमास लागले. काही तासानंतर त्यांना गोल्डीच्या हालचालीचा अंदाज येत नसल्याचे पाहून त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली.
शोधाशोध करत असतानाच त्यांना गोल्डी गतप्राण होऊन पडल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणात त्या कोंबड्यावर विषप्रयोग झाल्याचा त्यांना दाट संशय आहे. हे प्रकरण आपण पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स अर्थात पेटा या संस्थेकडे घेऊन जाणार असल्याचे विश्वकर्मा यांनी सांगितले.पशु निर्दयीपणा कायदा 1960 अन्वये कारवाई करण्याची मागणी देखील त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
तर दुसर्या घटनेत खारघर से.-15 येथे राहणारे इस्माईल शेख यांना मांजर पाळण्याचा छंद आहे. त्यांच्या घरी दोन मांजरे व त्यांची पाच पिल्ले तसेच एक नर मांजर आहे. ते त्यांच्या मांजरांना फूड देण्याकरता गेले असता सेमी पार्शियन नर मांजर हे घरात दिसले नाही. म्हणून त्याला पाहण्यासाठी ते गॅलरीमध्ये आले असता त्यांना पार्शियन नर मांजर हे बिल्डिंगच्या खाली मोकळ्या रस्त्यावर पडलेले दिसले. या मांजराला कोणीतरी अज्ञात इसमाने जीवे ठार मारले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संवेदनशील असे नाते
गोल्डी या पाळीव कोंबड्यासोबत बबन विश्वकर्मा यांचे अत्यंत संवेदनशील असे नाते होते. आमदार बाळाराम पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून हा कोंबडा बबन यांना भेट म्हणून देण्यात आला होता. भारताच्या राज्यघटनेतील कलम 51 ए(जी) अंतर्गत प्राण्यांना दया दाखवणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य परिपूर्णरित्या बजावत बबन विश्वकर्मा यांनी त्या कोंबड्याला अभय घेऊन त्याचे पालन पोषण करण्यास सुरुवात केली होती.