| सुकेळ | वार्ताहर |
गेल्या कित्येक वर्षांपासून वाहतुकीसाठी महत्वाचा असा दुवा समजल्या जाणार्या वाकण जवळील सद्यस्थितीत वाहतुकीसाठी बंद असलेल्या अंबा नदिवरील ब्रिटिश कालीन पुलावरचे लोखंडी पाईप हे मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या पुलावरुन मुंबई बाजुकडुन तसेच खोपोली -पाली- वाकण मार्गे देखिल याच पुलावरुन 24 तास वाहनांची जाण्या येण्याची रहदारी सुरू होती. या पुलाचे काम ब्रिटीश काळात केले असल्यामुळे या पुलाचे बांधकाम ढासळले होते. या पुलाची भयानक अवस्था झाली होती. त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर पुर्णत्वास होणे गरजेचे होते. परंतु महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी नविन पुलाचे काम हे जलद गतीने पुर्ण करुन या नविन पुलावरुन वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे वाहतुकीसाठी जुना पुल हा बंद करण्यात आला.
सध्याच्या परिस्थितीत हा जुना पुल बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावरील लोखंडी पाईप चोरीला जात असल्याचे काही नागरीकांच्या निदर्शनास आले आहे. या पुलावरील अनेक पाईप चोरीला गेले आहेत. यामागे नक्की कोणाचा हात आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान नागोठणे परिसरासह वाकण, सुकेळी परिसरामध्ये भंगारवाल्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे.