धक्कादायक! बसस्थानकाची संरक्षक भिंत कोसळली; पाच महिला जखमी

। तळा । श्रीकांत नांदगावकर ।

तळा बसस्थानकातील संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मच्छीविक्रेत्या महिला जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नानवलीवरून आलेली बस क्रमांक एम.एच.40 एन 9204 चालक स्थानकात लावत असताना बसच्या मागील बाजूची धडक संरक्षक भिंतीला बसल्याने ही संरक्षक भिंत मच्छी विक्रेत्या महिलांच्या अंगावर कोसळली. यामध्ये लखमु माया सुतार, अनुसया लक्ष्मण सुतार, यमुना भानजी देवे, हिरा रामचंद्र फकीरे व लीला विजय खुटीकर या मच्छीविक्रेत्या महिला जखमी झाल्या.

नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ढिगार्‍याखाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढून तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. या आधी देखील एसटीची धडक लागल्याने संरक्षक भिंत कोसळून एक महिला जखमी झाली होती. मात्र तरीदेखील मच्छीविक्रेत्या महिला या भिंतीशेजारीच बसून आपली मच्छी विक्री करीत होत्या. नगरपंचायतीमार्फत मच्छीविक्री बाहेर होत, असताना ठोस पावले उचलली गेली नसल्याने या दुर्घटनेला नगरपंचायत प्रशासनही तेवढाच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची तळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version