दुकानदाराला मारहाण करून रोकड लंपास

| पनवेल | प्रतिनिधी |

दुकानात घुसून दुकानदाराला मारहाण करून गल्ल्यातील सहा हजार रुपये जबरदस्तीने घेऊन गेल्याच्या आरोपावरून पनवेल शहर पोलिसांनी इदरीस नियाज शेख याला अटक केली आहे. त्याच्याकडून 3 हजार 200 रुपये रोख आणि रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल रेल्वे रोडवरील नर्मदा कॉम्प्लेक्ससमोरील दुकानात शंकर रामविलास गुप्ता हे काम करत होते. त्यावेळी इदरीस शेख व त्याचे साथीदार दुकानात आले. त्यांनी गुप्ता यांना शिवीगाळ केली. आयान शेख आणि उबेद यांनी गुप्ता यांना पकडून ठेवले, तर इदरीस याने मारहाण करून दुकानाच्या गल्ल्यातील सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस हवालदार तुषार बोरसे, पोलीस नाईक सम्राट डाकी, अनिल चव्हाण, पोलीस शिपाई दत्ता जाधव, साईनाथ मोकळ, विशाल दुधे व सचिन कोर यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेत असताना खास बातमीदाराकडून पोशी साईनाथ मोकळ याना आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून इदरीस शेख याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 3 हजार 200 रुपये हस्तगत करण्यात आले. पुढील तपास सपोनि अभिजीत पाटील करीत आहेत.

Exit mobile version