| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल परिसरातील मध्य कोकण रेल्वे मार्गालगत आठवडा बाजार भरवला जात आहे. परंतु, हा बाजार नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि लहान मुलांसह अनेक कुटुंब जीव धोक्यात घालून या बाजारात येत आहेत.
या गंभीर परिस्थितीकडे अद्याप कोणत्याही प्रशासनाचे लक्ष गेले नसल्याचे दिसून येत आहे. बाजारात व्यवसाय करणारे अनेक विक्रेते हे नवी मुंबईच्या बाहेरील भागातून येत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते. त्यामुळे या बाजाराच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, आठवडा बाजारात भाज्या, फळे व इतर जीवनावश्यक वस्तू तुलनेने स्वस्त दरात मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी हा बाजार महत्त्वाचा ठरतो. वाढत्या महागाईमुळे आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या कुटुंबांसाठी हा बाजार एक दिलासा ठरत आहे. मात्र, स्वस्त दराच्या मोहापायी नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जीव धोक्यात घालून खरेदी
