परंपरा, आधुनिकता व पर्यावरणपूरकतेचा संगम
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, रेवदंड्यासह अलिबाग, रोहा आणि पेण या आसपासच्या बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. श्रद्धा, परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवत बाजारपेठा झगमगल्या आहेत.
फुलांची आरास, मूर्तींच्या सजावटीचे साहित्य, रोषणाईच्या माळा, विद्युत दिवे, कंदील, विविध प्रकारची मखरे आणि सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा बहरल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदा ग्राहकांची पसंती पर्यावरणपूरक सजावटीकडे जास्त असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. कागद, बांबू व लगद्यापासून तयार केलेली फोल्डेबल मखरे, तसेच घरगुती गणेशासाठी मिनी मखर ही नवीन संकल्पना लोकप्रिय ठरत आहे.
पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन वॉटरप्रूफ सजावटीचे साहित्य, तसेच एलईडी लाइट्सचा झगमगाट ग्राहकांना आकर्षित करत आहे. रेवदंडा, अलिबाग, पेण व रोहा बाजारपेठेत संकल्पनेवर आधारित मखरे, शिवकालीन किल्ले, अयोध्येतील राममंदिर व देवदेवतांचे कटआउट्स सजवलेले मखर ग्राहकांना भावत आहेत.
गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव नसून लघुउद्योजकांसाठी रोजगाराचाही मोठा हंगाम ठरतो. मूर्तिकार, डेकोरेटर्स, मखर निर्माते, इलेक्ट्रिक सामान विक्रेते, फुले आणि मिठाई व्यावसायिक यांच्यासाठी ही वेळ वर्षभराच्या धंद्याची संधी ठरते. स्थानिक विक्रेते सांगतात की, “दोन महिन्यांच्या विक्रीत वर्षभराचा धंदा उभा राहतो. ग्राहकांकडून यंदा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.”“मिठाईत ‘हेल्दी’ ट्रेंड“मोदक, पेढे, लाडू यांसोबत यंदा शुगर-फ्री व मिलेटपासून बनवलेले मोदक विक्रीस आल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरोग्याचा विचार करणाऱ्या भक्तांसाठी हा ट्रेंड लोकप्रिय ठरत आहे.
कंदील, एलईडी स्ट्रिप लाइट्स, फ्लॅशिंग सिरीज, प्रोजेक्शन लाइट्स यांच्या विक्रीत तब्बल 25 टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. संध्याकाळी रेवदंड्यासह अलिबाग, पेण व रोहा बाजारपेठांतील स्टॉल्स झगमगत असून, गणेशभक्त मंत्रमुग्ध होत आहेत. ‘गगनचुंबी मुंबई’सारख्या आधुनिक संकल्पनांवर आधारित मखरे, तसेच इतिहास व विज्ञान-तंत्रज्ञानाची सांगड घालून तयार केलेली सजावट ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. श्रद्धा, संस्कृती, आधुनिकता आणि पर्यावरणपूरकता यांचा संगम यंदा बाजारपेठेत ठळकपणे जाणवत आहे. रेवदंड्यासह अलिबाग, रोहा, पेण बाजारपेठा झगमगत असल्या तरी हा उत्साह केवळ इथवरच मर्यादित नाही. संपूर्ण कोकणात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू असून, श्रद्धा, परंपरा, आधुनिकता आणि पर्यावरणपूरकतेचा संगम साधत कोकणातला बाप्पा उत्सव अधिक रंगतदार ठरत आहे.






