नागोठण्यात कारवाईच्या भीतीने दुकाने बंद

| नागोठणे | प्रतिनिधी |

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, महाराष्ट्रात भेसळखोरांविरुद्ध आणि नियम भंग करणाऱ्यांविरुद्ध एक धडक मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्यभरात अनेक ठिकाणी धडाकेबाज कारवाई सुरू आहे. अशाचप्रकारे कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची टीम नागोठण्यात येणार असल्याची माहिती येथील व्यावसायिकांना मंगळवारी (दि.20) सकाळी मिळाली. त्यानंतर ही माहिती सर्वत्र पसरताच नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, बाजारपेठ, खुमाचा नाका, तसेच महामार्गावरील अनेक हॉटेल व्यावसायिक, मिठाई दुकानदार, छोटे- छोटे दुकानदार तसेच अन्य काही दुकानदारांनी कारवाईच्या भीतीपोटी, घाबरून जाऊन आपापली दुकाने बंद ठेवली होती.

यासंदर्भात हॉटेल, मिठाईवाले व अन्य दुकाने असलेल्या परिसरात माहिती घेतली असता तेथील विविध प्रकारची अनेक दुकाने बंद असलेली दिसून आली. विशेष करून हॉटेल व्यावसायिकांनी याचा धसका घेतल्याचे दिसून आले. हॉटेल व्यवसायात काहींकाही उणिवा नक्कीच सापडू शकत असल्याने येथील दुकानदारांनी आपापली हॉटेल्स सकाळी सुरू केली असली तरी अन्न व औषध प्रशासनाची टीम येणार असल्याची माहिती मिळताच दुपारी 12 नंतर बंद करणे पसंत केले. मात्र, भीतीपोटीने दुकाने बंद करण्यात आली असली तरी, दरम्यान यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने दुकाने बंद आलेल्या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता दुपारी 2 वाजेपर्यंत तरी अन्न व औषध प्रशासनाची कोणतीही टीम नागोठण्यात आली नसल्याचे आणि कुणावरही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने दुकानदार दुकाने बंद करीत असतील तर नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

मुंढे यांनी केलेल्या कारवाई
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 1100 हून अधिक छापे टाकले आहेत. 25 मे 2026 नंतर अनेक अन्न व्यवसायिकांच्या ठिकाणी 1100 हून अधिक रेड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भेसळयुक्त वस्तू जप्त करणे, लाखो लिटर नकली दूध, कित्येक टनाचे भेसळयुक्त पनीर आणि शिर्डीमध्ये भेसळयुक्त प्रसादसुद्धा जप्त आणि नष्ट करण्यात आला आहे.
Exit mobile version