अरुंद रस्त्यामुळे प्रवाशांची गेरसोय

| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली रेल्वे स्टेशनलगत रेल्वेकडून भिंत बांधण्यात आली आहे. यात प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी एकच मार्ग ठेवला असून, तोही अरुंद असल्याने लोकल आल्यावर येथून जाताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. याची दखल घेत खोपोली प्रवासी संघटनेकडून रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देऊन दोन ठिकाणी मार्ग किंवा आहे तो मार्ग रुंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

खोपोली प्रवाशी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी एकच अरुंद मार्ग ठेवल्याने निर्माण होणार्‍या अडचणी, आपत्कालीन स्थितीत संभाव्य चेंगराचेंगरीची शक्यताबाबत खोपोली स्टेशन प्रबंधक अगस्टक एक्का यांची भेट घेऊन लोकल आल्यावर निर्माण होणारी परिस्थिती दाखवली व तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लेखी पत्र देऊन केली. तसेच तिकीट खिडकी प्रवेशासाठीही अतिरिक्त व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली असल्याचे प्रवासी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष दत्तात्रय शेंडे, सचिव नितीन पाटील, उपाध्यक्ष आनंद सोनवणे यांनी सांगितले. त्यानुसार दोन ठिकाणी जाण्यायेण्याची वाट किंवा आहे त्या ठिकाणी रुंद रस्ता करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकारी अगस्टक एक्का यांनी आश्‍वासन दिले आहे.

Exit mobile version