। नागोठणे । वार्ताहर ।
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. अशावेळी शेतकर्यांना आवश्यक असलेली भात बियाणे व खताचा पुरवठा हा जवळच्या कृषी सेवा केंद्रातून केला जातो. सध्या बहुतेक कृषी केंद्रावर भात बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले दिसून येत आहे. दुर्गम भागातील व आदिवासी वाड्यांवरील शेतकरी राजा भाताबरोबरच युिारया खतसुध्दा एकत्रितपणे सोबत घेऊन जात असतात. मात्र, हे खत कृषी सेवा केंद्रांवर अद्याप उपलब्ध न झाल्याने शेतकरी बांधवांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी नागोठण्यातील खताच्या दुकानात हेलपाटे मारत आहेत. मात्र, आजपर्यंत हे युरिया खत उपलब्ध न झाल्याने नागोठणे विभागांतील शेतकरी त्रस्त झाले आहे. या शेतकर्यांनी आज नागोठण्यातील दुकानात येऊन आर.सी.एफ. कंपनीवरील आपली नाराजी व्यक्त केली. शेतकरी लांबच्या ठिकाणी राहत असल्याने व खास खत खरेदीसाठी पुन्हा दुकानात येणे त्यांना परवडत नसल्याने शेतकरी निव्वळ भात बियाणे विकत घेण्यापेक्षा फक्त चौकशी करून जात आहेत. पण नेहमीप्रमाणे आरसीएफ कंपनीतून ट्रांसपोर्टचे कारण पुढे करण्यात येत असल्यामुळे खरीप हंगाम सुरू झाला तरी कृषी केंद्रांवर अद्याप खते उपलब्ध झालेली नाहीत. यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. त्यामुळे आरसीएफ कंपनीने आवश्यकता असलेल्या जिल्ह्यातील नागोठणे, रोहा, पाली व पेणमधील काही कृषी केंद्रावर खते त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकर्यांकडून व कृषी केंद्र धारकांकडून होत आहे.
नागोठण्यात झालेली खताची टंचाई ही गंभीर बाब आहे. त्यामुळे तालुका व जिल्हा कृषी अधिकारी तसेच संबधित यंत्रणेने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा.
जयंत वाघ, संचालक,
वाघ कृषी सेवा केंद्र, नागोठणे