। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकतेच गेल्या आठवड्यात तिचे पदक थोडक्यात हुकले होते. यानंतर तिने कुस्तीतून निवृत्तीही घेतली. आता दोनदिवसांपूर्वीच तिने राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश केला आहे. तिने कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर लगेचच तिला हरियाणातून काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी उमेदवारीही दिली आहे. अशातच आता रेल्वेकडून विनेशला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत उत्तर रेल्वेच्या अधिकार्यांकडून पुष्टी करण्यात आली आहे. कारण विनेश रेल्वेमध्ये नोकरीला होती.
उत्तर रेल्वेच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार 4 सप्टेंबर 2024 रोजी तिला ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासूनच विनेश काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. तिने राहुल गांधी यांची भेटही घेतली होती. अधिकार्याने पुढे सांगितले की, ती सरकारी कर्मचारी असल्याने ती राजकीय पक्षात सामील होणे हा सेवा नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे तिला तिची भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. तथापि काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी शुक्रवारी आरोप केला की विनेशने रेल्वेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू उपाध्याय यांनी हा आरोप फेटाळला आहे. उपाध्याय यांनी सांगितले की तिने राजीनामा देण्यापूर्वीच तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.