बांधकाम विभागावर चित्रलेखा पाटील यांचा हल्लाबोल
। रायगड | जिल्हा प्रतिनिधी ।
नागाव-पाल्हे पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली केवळ दिखावा केल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी पुलाचा कठडा कोसळल्याने या पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तातडीने दुरुस्ती न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर शेकाप स्टाईलने हल्लाबोल आंदोलन छेडण्याचा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
नागाव, रेवदंडा, अलिबाग, काशीद, मुरूडसह अनेक गावांना जोडणारा नागाव-पाल्हे पूल अत्यंत जुना आणि अरुंद आहे. गेल्यावर्षी पुलाचा काही भाग खचल्याने दगडी बांधकाम ढासळले होते. त्यानंतर पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली होती. मात्र, या आदेशाची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप चित्रलेखा पाटील यांनी केला आहे. जेएसडब्ल्यूसह अन्य कंपन्यांची अवजड वाहने आजही या मार्गावरून सर्रास धावत असल्याने पुलावरील ताण अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीसाठी विविध सामाजिक संस्था आणि शेकापकडून वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून दुरुस्तीचे सोंग घेतल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्षात पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत असून, रविवारी पुलाचा कठडा कोसळल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती अधिक गडद झाली आहे. पर्यटन हंगामात या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकते, असा आरोप करत चित्रलेखा पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती
नागाव-पाल्हे पुलाचा काही भाग ढासळल्याने पुलाच्या संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. पुलाची रचना कमकुवत झाल्याने तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. हा पूल कोसळल्यास नागाव, रेवदंडा, काशीद, मुरूडसह अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. तसेच पर्यटक, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांच्या वाहतुकीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने पुलाची तपासणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदार कारभार आता सहन केला जाणार नाही. वारंवार सूचना, निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. आता पुलाचा कठडा कोसळल्यानंतरही प्रशासन जागे झाले नाही, तर शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र हल्लाबोल आंदोलन छेडेल. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी पुलाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
चित्रलेखा पाटील, शेकाप प्रवक्त्या
