पंचक्रोशीत भाविकांचे श्रध्दास्थान
| रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यात कुरूळ, वाडगाव, वेश्वी व बेलकडे पंचक्रोशतील भाविकांचे श्रध्दा व भक्तीस्थान असलेल्या रसायनी टेकडीवर श्री दत्त यात्रेस मोठी गर्दी भाविकांची होते. जिल्हांत श्री दत्त जयंतीनिमित्त ठिकठिकाणी उत्सव व यात्राचे पारंपारीक आयोजन असते. यामध्ये अल्पावधील रसायनी टेकडीवर श्री दत्त यात्रा प्रसिध्दीस आहे. अलिबाग शहराचे अगदीच नजीक असलेल्या रसायनी टेकडीवरील श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी वाडगाव, कुरूळ व वेश्वी या बाजूने जाण्यासाठी रस्ता व पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कुरूळ, वेश्वी, वाडगांव व बेलकडे या चार गावाचा श्री स्वामी दत्तात्रेय चैतन्यधाम दत्त मंदिर ट्रस्ट प्रतिवर्षी श्री दत्त जयंती निमित्त उत्सव व यात्रेचे आयोजन करते. वाडगावचे कै. काशिनाथ भगत, वेश्वीचे गणपत चिमणाजी पाटील आदी चार प्रतिनिष्ठ नागरिकांनी रसायनी टेकडीवर श्री दत्त मुर्तीची स्थापना करून श्री दत्त जयंती निमित्त उत्सव सन 1976 मध्ये सुरू केला. सन 2007 मध्ये येथील श्री दत्त मुर्तीचे नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे . या उत्सवाचे श्री दत्त जयंती निमित्त हळूहळू यात्रेत रूपांतर झाले. यावर्षी श्री स्वामी दत्तात्रेय चैतन्यधाम दत्त मंदिर ट्रस्ट श्री दत्त मंदिराचा 47 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
वेश्वी येथील गणपत पाटील यांनी रसायनी टेकडी श्री दत्त मंदिरात संस्थापक व अध्यक्ष म्हणून तिस वर्ष कार्यकाल सांभाळला. त्यानंतर कुरूळ येथील विठोबा पाटील यांनी 12 वर्षे, ॲड प्रसाद पाटील यांनी पाच वर्षे अध्यक्षपद भुषविले. सध्या ॠषीकांत भगत हे श्री स्वामी दत्तात्रेय चैतन्यधाम दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपदी असून कार्याध्यक्षपदी ॲड. प्रसाद पाटील, सचिव सुधीर वेगुलेंकर, खजिनदार विठोबा पाटील व विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ यात्रा उत्सव कमिटी यांनी रसायनी टेकडी श्री दत्त मंदिरात उत्सव व यात्रेचे नियोजन करत आहेत. या श्री दत्त यात्रा उत्सवास कुरूळ, बेलकडे, वाडगाव व वेश्वी ग्रामपंचायती व सर्व पक्षीय कार्यकर्ते सहकार्य करतात.
वर्षभरात या श्री दत्त मंदिरात गुरू पौर्णिमा, तसेच प्रत्येक गुरूवारी या दिवशी मोठी गर्दी असते. छोटेशी टेकडी असलेला रसानी टेकडीवर वन खात्याने वृक्ष लागवड प्रकल्प राबविले आहे. तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे वतीन वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामुळे रसायनी टेकडी परिसर निसर्ग रम्य असे ठिकाण बनले आहे. या रसानी टेकडीवरून दुरवर नजर टाकल्यावर निसर्गरम्य विलोभनिय दृश्य दिसते. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठया संख्येने भाविका व पर्यटक भेटीस येतात. या वर्षी रसायनी टेकडी श्री दत्त मंदिरात दि. 25 डिसेंबरपासून शनिवार दि. 30 डिसेंबरपर्यत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच श्री दत्त जयंतीनिमित्त वाडगाव येथे प्रतिवर्षी कुस्ती व कबडडीचे सामने आयोजीत करण्यात येतात, यावर्षी प्रतिवर्षा प्रमाणे महिला कबडडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.