। मुंबई । प्रतिनिधी ।
श्रेयांश सोमैयाने सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला. त्याने यासह स्पर्धेत संयुक्तपणे आघाडी मिळवली. श्रेयांशसह आश्वी अग्रवाल, सोहम पवार, पलाश मापारा, प्रतीक यादनीक, राजवीर नहार, अनिरुद्ध अय्यर आणि अहान कातरूका यांनीही प्रत्येकी 3 गुणांसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले. पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या बोर्डवर सोमैयाने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना दमदार फॉर्ममध्ये असलेल्या अथर्व पोलेकरचा (2 गुण) पराभव केला. संथ सुरुवात केल्यानंतर सोमैयाने अप्रतिम चाली रचत अथर्वची कोंडी करत त्याला चुका करण्यास भाग पाडले. पाचव्या बोर्डवर पलाश मापारानेही काळ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रेयस वाघमारेचा (2 गुण) पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. एएफएम सोहम पवारने सफेद मोहऱ्यांनी खेळताना सुरुवातीपासून नियंत्रण राखून अनिश कश्यपचा पराभव केला.






