पर्यटन हंगामाचा श्रीगणेशा

ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच मुरूडला पर्यटकांचं आगमन; व्यावसायिकांनी मरगळ झटकली

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

तब्बल महिन्यानंतर मुरूड समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी उशिरा पर्यटकांचे आगमन झालेले दिसून आले. समुद्रकिनारी मोफत पार्किंगवर पर्यटकांची वाहने रांगेत लावलेली दिसत होती. खूप दिवसानंतर व्यवसायाला काहीशी तेजी आल्याने व्यावसायिकदेखील मरगळ झटकून स्वागताला तयार झाल्याचे किनार्‍यावर दिसून येत आहेत.

गेल्या महिन्यापासून मुरूड तालुक्यातील पर्यटक नसल्याने पर्यटन पूर्णपणे थंडावले होते. व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. जंजिरा पाहण्यासाठी गर्दी नव्हती. पर्यटक जलवाहतूक करणार्‍या सोसायटीनादेखील याचा फटका बसला. सतत पर्यटकांचा शुकशुकाट कायम होता. वादळी पावसाचादेखील पर्यटनावर मोठा परिणाम जाणवला. शनिवारी पावसाने सकाळपासून उसंत घेतल्याने वातावरण सायंकाळपर्यंत निरभ्र होते. मुरूड परिसरात पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी सायंकाळी पर्यटक येताना दिसत होते. मुरूडमधील हिरा रेसिडेन्सी लॉजचे मालक महेंद्र पाटील यांनी सायंकाळी सांगितले की, शनिवारपासून पर्यटक येऊ लागले असून, बुकिंग होत आहे. समुद्रकिनारीदेखील पर्यटक फिरण्यासाठी उतरले होते. पाऊस थांबला तर पर्यटकांची वर्दळ वाढेल, अशी शक्यता पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. कधीही पडणारा पाऊस आणि समुद्रात उठणारे वादळी वारे यामुळे मासेमारीचे नुकसान झाले असून, सिझन असूनही मोठी मासळी अद्याप तरी मार्केटमध्ये दिसून आलेली नाही. मुरूडकडे येणारे बहुतांश पर्यटक ताजी मासळी खाण्यासाठी येत असतात, असा सर्वानाच अनुभव आहे.त्यामुळे मासळीची आवक वाढणे आवश्यक आहे. येत असलेले नुसते बोंबील किंवा कोलंबी मासळी पुरेशी नाही, अशा प्रतिक्रिया काही पर्यटकांनी व्यक्त केल्या.

गेल्या तीन महिन्यांपासून पर्यटकांचा ओघ कमी कमी होत गेल्याने पर्यटन व्यवसाय ठप्पच झाला होता. पर्यटक नसल्याने खोरा बंदर जेट्टीवरून लाँचमधून केली जाणारी पर्यटक जलवाहतूकदेखील बंद पडली होती. त्यामुळे तेथील स्टॉल्सदेखील बंद पडले. आता वातावरण निवळल्याने पर्यटन वाढेल, अशा अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत.

Exit mobile version