श्री महागणपती सेंद्रिय गटाला उत्कृष्ट सेंद्रिय पुरस्कार प्रदान

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर येथील श्री महागणपती सेंद्रिय गटाला कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा 2022-23 चा उत्कृष्ट सेंद्रिय गटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रायगड यांच्या विद्यमाने येथील सिडको मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 2023 च्या जिल्हा कृषी महोत्सवात जिल्हा कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले यांच्या हस्ते श्री महागणपती सेंद्रिय गटाचे अध्यक्ष प्रफुल्ल खारपाटील, सदस्य अनिल केणी, दामोदर मुंबईकर व रवींद्र ठाकूर या सर्वांनी हा पुरस्कार स्वीकारला असून, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गटाच्या शेतकर्‍यांना गौरविण्यात आले.

चिरनेर येथील शेतकर्‍यांनी तीन वर्षांपूर्वी श्री महागणपती सेंद्रिय गटाची निर्मिती केली असून, गटाचे हे चौथे वर्ष सुरू आहे. यात प्रामुख्याने येथील शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला असून, तज्ञ कृषी अधिकार्‍यांकडून सेंद्रिय शेती बाबत प्रशिक्षण दिले जात आहे. गांडूळ खत, शेणखत वापरावर येथील शेतकर्‍यांनी भर दिला असून, पिकांना जीवामृतही दिले जाते. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढली असल्याचा अनुभव येथील शेतकर्‍यांना आला आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी सेंद्रिय शेती असून, सामूहिक यांत्रिकीकरण, कडधान्य लागवड आणि विविध कृषी योजना या गटाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. एकंदरीत श्री महागणपती सेंद्रिय गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती गटाला चालना मिळत आहे.

Exit mobile version