मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्‍वर व्यायामशाळेला जेतेपद

मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या आर.वाय.पी. निमंत्रित विभागीय मल्लखांब स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्या. या स्पर्धा प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे संस्थापक रमेश प्रभू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केल्या होत्या. स्पर्धा विभागीय असल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलासहित मुंबई शहर, उपनगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, वसई, विरार व पालघर या विविध जिल्ह्यातील एकूण 28 संघांचा सहभाग होता.
मल्लखांब खेळातील पहिली अर्जुन पुरस्कारप्राप्त हिमानी परब, दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त उदय देशपांडे, संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, संकुलाचे विश्‍वस्त राजू रावल, डॉ.मोहन राणे व मकरंद अडुळकर, ज्येष्ठ प्रशिक्षक महेश अटाळे या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत महिलांच्या गटात श्री पार्लेश्‍वर व्यायामशाळा 40.60 गुण मिळवून पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला. त्यापाठोपाठ श्री समर्थ व्यायाम मंदिर 40.10 व साने गुरूजी आरोग्य मंदिर 39.00 गुण मिळवून दुसर्‍या व तिसरा क्रमांक पटकाविला. या सर्व स्पर्धा महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या व मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने झाल्या. महाराष्ट्राचे तांत्रिक समिती सदस्य रवी गायकवाड यांच्या निरीक्षणाखाली स्पर्धा पार पडल्या. तर मल्लखांब संघ अंधेरीचे सचिव गणेश देवरूखकर यांनी स्पर्धा प्रमुख या नात्याने आपली जबाबदारी पूर्ण केली.

Exit mobile version