श्री सोमजादेवी मातेचा रथउत्सव साजरा

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील ग्रामदेवता श्री सोमजादेवी मातेचा सप्ताह व रथउत्सव सोहळा मंगळवारी (दि.28) संपन्न झाला. साधारण सन 1877 साली श्रीवर्धन गावात मरी रोगाची साथ सुरू झाली.या रोगामुळे गावातील लोक पटापट मृत्यू पावायला लागले. गावकर्‍यांनी एकत्र येऊन श्री सोमजादेवीच्या चरणी प्रार्थना केली की, आम्ही गावकरी या दिवसापासून तुझ्या मंदिरात सतत सात दिवस अखंड भजनाने जागून तुझी सेवा करू व गावातून रथातून तुझी पालखीमधुन मिरवणूक काढू. तेव्हापासून देवीचा रथउत्सव सुरू झाला. रथउत्सव सोहळा मार्गशीर्ष महिन्यात होतो. मार्गशीर्ष महिन्यातील दत्तपोर्णीमा झाली की कृष्ण प्रतिपदेपासून देवीसाठी पहारा म्हणजेच सप्ताह सुरू झाला.
भजनांचा सप्ताह कार्यक्रम संपन्न झाला की, आठव्या दिवशी मंदिराकडून गावाला महाप्रसादाचे जेवण दिले जाते. महाप्रसादाचा कार्यक्रम झाला की आठव्या दिवशी रात्री मध्यरात्री 12 नंतर रथउत्सवाला प्रारंभ होतो. मध्यरात्री रथ मंदिरातून बाहेर काढला जातो. गावाच्या रक्षणासाठी, अरिष्ट दुर होण्यासाठी भजन, ढोल-ताशांच्या गजरात गावात फिरवला जातो. रथावर श्री सोमजादेवी मंदिराचे विश्‍वस्त विराजमान होतात.

Exit mobile version