जिल्ह्यात 129 ठिकाणी मिरवणुकांचा जल्लोष
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि.26) श्रीराम जन्मोत्सव ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने 129 ठिकाणी मिरवणुकांचा जल्लोष असणार आहे. या निमित्ताने 31 हून अधिक ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.
रायगड जिल्ह्यात 162 श्रीराम मंदिर आहेत. या मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. सकाळी विधीवत पुजा झाल्यानंतर गावागावात भजनांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी श्रीराम जन्मोत्सवाला सुरुवात केली जाणार आहे. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त खाद्य पदार्थांसह खेळण्यांचे साहित्य व हार, फुलांची दुकाने असणार आहेत. सायंकाळी अनेक गावांमध्ये मिरवणूका काढल्या जाणार आहे. या मिरवणुकांमध्ये बेंजो वाद्यांसह खालूबाजा या पारंपारिक वाद्यांचा जल्लोष पहावयास मिळणार आहे. लाठी काठी, दांडपट्टा आदी मर्दानी शिवकालीन खेळांचे प्रदर्शन व सादरीकरणही यावेळी होणार आहेत. मिरवणुकीच्या दरम्यान सामाजिक प्रबोधनासह वेगवेगळ्या प्रकारचे सोंगणे काढण्याची परंपरा आहे. ही परंपरादेखील जपली जाणार आहे. मुंबई, बोरीवली येथे असणारे चाकरमानीदेखील या उत्सवांमध्ये सहभागी होणार आहे.
हा उत्सव आनंदात व शांततामय वातावरणात साजरा करता, यावा, यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे.एक हजार 296 सुरक्षा कर्मचारी असणार आहेत. त्यामध्ये 85 पोलीस अधिकारी, 885 पोलीस कर्मचारी, 250 होमगार्ड, 76 वाहतूक पोलीस यांचा समावेश असणार आहे. तसेच अतिशिघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दल, आरसीपी दल, स्ट्रायकींग फोर्स आदी सुरक्षा यंत्रणाचा कडेकोट पहारा या कालावधीत असणार आहे.
