श्रीवर्धन आगाराचे वेळापत्रक कोलमडलेले

प्रवाशांना विनाकारण मनस्ताप

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन परिवहन आगाराचे वेळापत्रक नेहमीच कोलमडलेले असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक लांब पल्ल्याच्या फेर्‍या नेहमीच उशिरा सुटताना दिसतात. याबाबत वाहतूक नियंत्रकांकडे चौकशी केली असता बस तयार नाही, ड्रायव्हर आला नाही, कंडक्टर आला नाही, थोड्याच वेळात सुटेल, अशी मोघम उत्तरे देण्यात येतात. वास्तविक पाहता ज्या बस चालकाची किंवा वाहकाची ड्युटी ठराविक वेळेला लावलेली असते. त्याने आपल्या ड्युटीच्या 15 मिनिटे अगोदर आगारामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु चालक, वाहकांमध्ये शिस्त नसल्यामुळेच श्रीवर्धन परिवहन आगारातील बसेस उशिरा सुटत असल्याचे दिसून येते. याचा प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अनेक वेळा बस मेंटेनन्स करून तयार नसल्यामुळे देखील उशिरा सुटत असल्याचे कारण सांगितले जाते. जर एखादी बस गाडी मुंबई किंवा पुणे येथून श्रीवर्धन आगारात आल्यानंतर तिची देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे असते. परंतु सदर बस केवळ पाण्याने धुऊन पुन्हा बस स्थानकामध्ये पुढील प्रवासासाठी पाठविली जाते. बस धुण्याचा प्रकार म्हणजे केवळ बाहेरून पाणी मारणे, एवढाच असतो. बसच्या आतमधील आसने अनेक वेळा धूळ बसलेली असतात. तर आसनांच्या खाली सुद्धा अनेक वेळा कचरा असल्याचे पाहायला मिळते.

आगारातून सुटणार्‍या बसेस अनेक वेळा अचानक रद्द करण्याचे प्रकार देखील घडत असतात. शनिवारी (दि.17) सकाळी श्रीवर्धन-पुणे-लातूर ही बस पाच वाजताची वेळ असताना देखील पाच वाजून 25 मिनिटांनी श्रीवर्धन बस स्थानकातून सुटली. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीवर्धन अलिबाग ही अत्यंत जुनी बस फेरी पुन्हा सुरू करावी. म्हणून प्रवाशांनी अनेक वेळा मागणी केली आहे. तरीसुद्धा श्रीवर्धन परिवहन आगाराने ही बस सेवा सुरू करण्यासाठी अद्यापपर्यंत पुढाकार घेतलेला नाही. तरी पेण येथील वाहतूक नियंत्रक श्रीवर्धन आगारातील या दुरावस्थेकडे तातडीने लक्ष देतील का? अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

Exit mobile version