शहरात बिल भरणा केंद्राची मागणी तीव्र
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
कार्यालय शहराबाहेर हलवल्यामुळे वीज ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून, श्रीवर्धनमध्ये पुन्हा मध्यवर्ती ठिकाणी बिल भरणा व तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे.
श्रीवर्धनमध्ये महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले कार्यालय 2021 पासून सुमारे तीन किलोमीटर दूर आरठी हद्दीत हलवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी बसस्थानकाजवळ कार्यालय असल्यामुळे नागरिकांना बिल भरणे व तक्रारी नोंदवणे सहज शक्य होते. मात्र, कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा भाड्याचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. अनेकदा बिलाच्या रकमेपेक्षा प्रवासाचा खर्च अधिक होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
महावितरणकडून ऑनलाइन सेवा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक नागरिकांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मीटर बिघाड, चुकीची बिलं किंवा वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या समस्यांसाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असून, त्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शहराच्या मध्यवर्ती भागात, विशेषतः बसस्थानक परिसरात किंवा प्रशासकीय इमारतीजवळ, तातडीने वीज बिल भरणा व तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक भाराबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मालकीच्या जागेत कार्यालय हलविल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी नागरिकांना ते मान्य नसून प्रत्यक्ष सोयी-सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे. लवकरात लवकर केंद्र सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
