श्रीवर्धनचा ‘आधार’ हरवला

11 महिन्यांपासून केंद्रे बंद; नागरिकांचे शासकीय कामकाज रखडले

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहर व तालुक्यातील नागरिकांना गेल्या तब्बल 11 महिन्यांपासून आधार कार्ड सेवेसाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. शहरातील तीन ही आधार नोंदणी व अद्ययावत (अपडेट) केंद्रे बंद असल्याने नवीन नोंदणी, पत्ता बदल, मोबाईल क्रमांक लिंक, बायोमेट्रिक अपडेट, दुरुस्ती आदी सर्व कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. परिणामी, हजारो नागरिकांचे शासकीय कामकाज रखडले असून संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधार अपडेट किंवा नोंदणीसाठी नागरिकांना बोर्ली पंचतन, म्हसळा, महाड, माणगाव आदी नजीकच्या तालुक्यांमध्ये जावे लागत आहे. एका अपडेटसाठी किमान एक दिवस खर्ची पडत असून प्रवास, भोजन व इतर खर्च मिळून 500 ते 1000 रुपयांपर्यंत आर्थिक भार सहन करावा लागत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना दिवसाचा मजुरी तोटा सहन करावा लागत असल्याने आर्थिक अडचणी अधिक तीव्र झाल्या आहेत.

आधार कार्ड हे शिष्यवृत्ती, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ पेन्शन, गॅस अनुदान, पीएम किसान योजना, बँक व्यवहार, शालेय प्रवेश, जात व उत्पन्न प्रमाणपत्र यांसारख्या विविध शासकीय सेवांसाठी अनिवार्य आहे. मात्र, शहरात सेवा उपलब्ध नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांना विलंब होत आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन प्रस्तावांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत, तर बँक खात्यांशी आधार लिंक नसल्याने व्यवहार अडकले आहेत.

विशेषतः दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना बाहेरगावी प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. बायोमेट्रिक अपडेटसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने त्यांची शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारची झीज होत आहे. आधार अपडेट नसल्याने दिव्यांग प्रमाणपत्राची प्रक्रिया थांबली आहे, अशी व्यथा काही लाभार्थ्यांनी व्यक्त केली. महिलांनाही लहान मुलांसह बाहेरगावी जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. लवकरात लवकर किमान एक कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. लोक प्रतिनिधींनी ही या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून प्रशासनावर दबाव आणावा, अशी मागणी जोर धरत आहे. श्रीवर्धनचा ‘आधार’ अक्षरशः हरवला असून, तो पुन्हा नागरिकांना कधी मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आधार सेवा पुन्हा सुरू करावी, हीच नागरिकांची एकमुखी अपेक्षा आहे.

प्रशासनाची भूमिका काय?
नागरिकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच संबंधित विभागांकडे अनेक वेळा लेखी निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप होत आहे. श्रीवर्धनसारख्या ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात आधार केंद्र नसणे ही गंभीर व लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.
Exit mobile version