शुभम रांजाणे टॅटू स्पर्धेत अव्वलस्थानी

माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा

। माथेरान । वार्ताहर ।

पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या टॅटू स्पर्धेत माथेरान मधील शुभम गणपत रांजाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावून माथेरानच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवलेला आहे. त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. लहानपणापासून चित्रकलेची नितांत आवड असल्यामुळे आणि शाळेत असतानासुद्धा चित्रकलेत अनेक पारितोषिक त्यांनी पटकावली आहेत. त्यामुळे त्यांनी आपला कल टॅटू कलेकडे वळवला आहे. त्यांचे वडील गणपत रांजाणे हे माथेरान मध्ये मोलमजुरी करून त्यांनी शुभम याला कॉलेज पर्यंतचे शिक्षण दिले आहे. मागील दहा वर्षांपासून ते याच क्षेत्रात कार्यरत असून सध्या लोणावळा येथील आपल्या दुकानात त्यांनी टॅटू काढण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यास ग्राहकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. तर अनेक सिनेमा कलाकार सुध्दा त्यांच्याकडून टॅटू काढून घेताना दिसतात. पंजाब टॅटू फेस्टिव्हल मध्ये देशातील विविध भागातील टॅटू कलाकारांना या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. भारतातून एकूण 250 स्पर्धक यामध्ये महाराष्ट्रातील 20 स्पर्धकांनी हजेरी लावली होती. यामध्ये दोन कॅटेगरी डिझाइनमध्ये (ओरिजिनल आर्ट वर्क) शुभम रांजाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. अनेक दिग्गज टॅटूचे कलाकार यावेळी स्पर्धेत सहभागी झाले होते. सलग तीन दिवस ह्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शुभम यांनी लाईव्ह टॅटू (ओरिजिनल आर्ट वर्क) स्केच करून आयोजकांना मंत्रमुग्ध केले. एक सुंदर आर्ट स्केच करत आयोजकांची आणि उपस्थित प्रेक्षकांसह अन्य कलाकारांची वाहवा मिळवून दुसर्‍या कॅटेगरी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी आयोजकांनी त्यांना आकर्षक ट्रॉफी आणि पंजाब आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version