जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत महिलांना रौप्य

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्यपदकाची कमाई केली आहे. जागतिक स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच यश मिळाले आहे. अंतिम फेरीत रशियाने भारतावर 2-0 अशी मात केली. अंतिम लढतीच्या पहिल्या डावात भारताची अव्वल खेळाडू द्रोणावल्ली हरिकाने चांगली सुरुवात केली. तिने अलेक्झांड्रा गोर्याचकिनाचा पराभव करत विजयी सलामी दिली. मात्र, भक्ती कुलकर्णीला कतरिना लाग्नोने, तर आर. वैशालीला अलेक्झांड्रा कोस्तेनिऊकने पराभूत केले. तसेच मेरी अ‍ॅन गोम्स व एलिना कॅशलिन्सकाया यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे पहिल्या डावात रशियाने 2.5-1.5 अशी सरशी साधली. दुसर्‍या डावात हरिका आणि गोर्याचकिना, तसेच वैशाली आणि कोस्तेनिऊक यांच्यातील सामने बरोबरीत संपले. उपांत्य फेरीत महत्त्वपूर्व विजय मिळवणार्‍या तानिया सचदेवचा खेळ अंतिम फेरीत फारसा बहरला नाही. तिला लाग्नोकडून पराभव पत्करावा लागला, तर गोम्सवर पोलिना शुव्हालोव्हाने मात केल्याने भारताने दुसरा डाव 1-3 अशा मोठ्या फरकाने गमावला. अंतिम फेरीत पराभव झाला असला तरी भारताने या स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली.

Exit mobile version