सिंधू, सेनची बाद फेरीत धडक

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

दोन वेळा ऑलिंपिक पदक पटकावणारी पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीत भारताचे आशास्थान असलेला लक्ष्य सेन यांनी पॅरिस ऑलिंपिकचा बुधवारचा दिवस गाजवला. सिंधू हिने इस्तोनियाच्या क्रिस्तीन क्युबा हिला 21-5, 21-10 असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. तर, लक्ष्य याने इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्ती याच्यावर मात केली. सिंधू व लक्ष्य यांनी अंतिम 16 फेरीत प्रवेश केला आहे. यापुढे बाद फेरी असल्यामुळे प्रत्येक लढत अटीतटीची असणार आहे.

पी. व्ही. सिंधू समोर तुलनेने कमकुवत आव्हान होते. तिने तिच्या प्रतिमेला साजेसा खेळ केला. पहिल्या गेममध्ये सिंधूच्या आक्रमक खेळापुढे क्युबाचा निभाव लागला नाही. सिंधूने हा गेम 21-5 असा सहज जिंकला. दुसर्‍या गेममध्ये क्युबाकडून थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सिंधूसमोर तिला तग धरता आला नाही. अखेर सिंधूने हा गेम 21-10 असा जिंकत एम गटामध्ये दोन गुणांसह पहिले स्थान पटकावले व उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता पुढील फेरीमध्ये सिंधूला बिंगजिओ हिच्याविरुद्ध खेळावे लागणार आहे.

लक्ष्य सेन-जोनाथन ख्रिस्ती यांच्यामधील लढतीतील पहिल्या गेममध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. ख्रिस्ती याने सलग पाच गुण मिळवत लक्ष्यवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. पण 8-2 असा पिछाडीवर असलेल्या लक्ष्य याने झोकात पुनरागमन करीत 8-8 अशी बरोबरी केली. त्यानंतर 18-18 अशी बरोबरी होईपर्यंत दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर लक्ष्य याने अखेरचे तीन गुण कमवताना उल्लेखनीय कामगिरी केली. 20-18 असे पुढे गेल्यानंतर पहिला गेमसाठी हवा असलेला विजयी गुण त्याने सहज मिळवत आश्‍वासक सुरुवात केली. त्यानंतर दुसरा गेम 21-12 असा जिंकून लक्ष्यने बाद फेरीत पाऊल ठेवले.

Exit mobile version