सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच!

ताय झू-यिंगविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव
| टोक्या | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत दिमाखात वाटचाल करणार्‍या पी.व्ही. सिंधूच्या पदरी शनिवारी अखेर निराशा पडली. बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणारी 26 वर्षीय सिंधू यावेळी त्या पदकाचे सुवर्णामध्ये रूपांतर करेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र, चायनीज तैपईच्या 27 वर्षीय ताय झू-यिंगने सिंधूवर 21-18, 21-12 असे सरळ दोन गेममध्ये वर्चस्व गाजवले. ही लढत तिने 40 मिनिटांत जिंकली.
सिंधू आणि ताय झू-यिंगमधील आकडेवारी पाहता, ताय झू-यिंगचेच पारडे जड दिसत होते. पहिल्या गेममध्ये सिंधू 8-4 अशी आघाडीवर असतानाही ताय झू-यिंगने कमाल केली. तिने क्रॉसकोर्टचे फटके आणि स्मॅशेसचा मारा करत सिंधूला हैराण केले. त्यामुळे सिंधू हतबल झाली आणि पिछाडीवर पडली. मग ताय झू-यिंगने पहिला गेम 21-18ने जिंकला.

Exit mobile version